साधारण १९७५ सालातली गोष्ट आहे. काही विद्युत कंत्राटदार आपल्या अडचणी सोडविण्यासाठी, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कार्यालयात गेले होते. तेथे त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन वाटेला लावण्यात आले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, आपण एकत्र येऊन संघटित व्हायला हवे. साधारणपणे दहा-बारा जणांनी एकत्र येऊन, 'पुणे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन' या नावाने संस्था स्थापन केली.
एकाच व्यवसायातल्या लोकांची संघटना स्थापन झाल्यावर, नुसती सरकारी कार्यालयातील कामे होण्यापेक्षा, व्यवसायातील नवीन तंत्रज्ञान संबंधित कायदे आणि नियम यांचे ज्ञान अद्ययावत व्हावे, माहिती मिळावी, म्हणून प्रयत्न सुरू झाले. कामकाज सुरू झाले.
हळूहळू साधारणपणे १९८३ मध्ये मुंबईस्थित 'इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र' (इकॅम) मध्ये ही संस्था विलीन करण्यात आली. सर्वश्री हरीभाई शहा, शिरीषभाई जव्हेरी यांच्या सल्ल्यानुसार इकॅम पुणे विभागाच्या स्थापनेची कल्पना मूळ धरू लागली, आणि पुरेशी सभासद संख्या होताच, दि. १४ ऑक्टोबर १९८४ रोजी 'इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र' (इकॅम) पुणे विभागाची स्थापना श्री. बाळासाहेब रानडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी श्री. महिंद्रसिंग माखिजा यांनी मानद सचिव म्हणून कार्यभार सांभाळला. १९८६ मध्ये प्रथमच निवडणुका होऊन सर्वश्री शशिकांत चितळे हे अध्यक्षपदी तर नंदकुमार वाडेकर हे सचिवपदी निवडून आले.
१९९० साली त्या वेळच्या सभासदांनी प्रत्येकी एक हजार रुपये गोळा करून, भारत भवन येथे संघटनेचे प्रशस्त असे, स्वतःच्या मालकीचे कार्यालय खरेदी केले. १९९१ च्या नोव्हेंबर महिन्यात टिळक स्मारक मंदिर येथे विद्युत साहित्याचे तीन दिवसीय भव्य असे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात मिळालेल्या उत्पन्नातून संघटनेच्या कार्यालयात फर्निचर करण्यात आले. सन २०१७, २०१८ आणि २०२२ मध्ये झालेल्या इकॅम एक्सपोची बीजे येथेच रोवली गेली, असे म्हणायला हरकत नाही.
सन २००० मध्ये इकॅमला ७५ वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी श्री. चिंतामणी बापट हे पुणे विभागाचे अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली हॉटेल प्राईड शिवाजीनगर येथे एक भव्य असा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी एम के इंडिया या कंपनीच्या वतीने प्रायोजकत्व स्वीकारण्यात आले होते. तसेच अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सभासदांसाठी एस्सेल वर्ल्ड आणि वॉटर किंग्डम येथे सहकुटुंब सहली आयोजित करण्यात आल्या.
पुढे श्री. सुरेश मांदळे हे अध्यक्ष झाल्यावर संघटनेची सभासदृद्धी झपाट्याने झाली. विविध कंपन्यांना भेटी, जसे की पॉलीकॅब, विनय इ. तसेच विविध कार्यशाळा चर्चासत्रे यांचे आयोजन त्यांच्या काळात झाले. याच काळात संघटनेची आर्थिक उन्नतीही खूप चांगली झाली.
या काळातच संघटनेचे कार्यालय सभासदांसाठी रोज संध्याकाळी सुरू केले गेले. दर बुधवारी सभासदांच्या समस्या सोडविण्यासाठी साप्ताहिक बैठका नियमितपणे सुरू झाल्या. महावितरणच्या उपविभागीय कार्यालयांमध्ये वेळोवेळी बैठका घेण्यात येत असत. त्यातून सभासदांच्या अडचणी सोडविण्यात आल्या. निधी संकलनासाठी प्रसिद्ध रंगकर्मी सुबोध भावे यांच्या एका नाटकाचे आयोजन केले होते.
कै. शिरीष देवधर यांना दुर्दैवाने फार कमी कालावधी मिळाला. या कालावधीमध्ये संघटनेच्या वतीने पूरग्रस्त भूकंपग्रस्त अशा लोकांना भरीव आर्थिक आणि जीवनोपयोगी साहित्याची मदत करण्यात आली. सभासदांसाठी पॉलीकॅब, अँकर तसेच बेळगाव • मधील भारत कॅब अशा कंपन्यांमध्ये अभ्यास भेटींचे आयोजन केले होते. याच काळात गणेश कला क्रीडा मंच येथे विद्युत साहित्याचे प्रदर्शनाही भराविले होते.
इकॅम पुणे विभागाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे रौप्य महोत्सव. आत्ताचे महासमितीचे अध्यक्ष, आणि पुणे विभागाचे तत्कालीन अध्यक्ष श्री. वामन भुरे यांच्या नेतृत्वाखाली रौप्य महोत्सवी वर्षाचे सर्व कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पार पडले. यावेळी विद्युत सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून खुली चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत अनेकांनी आपला सहभाग नोंदवला होता. जागो हिंदुस्तानी या देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन, विशाल केबल सह विविध कंपन्यांमध्ये अभ्यास भेटी, विविध विषयांवर कार्यशाळा / चर्चासत्रे यांचे आयोजन केले गेले.
कंत्राटदार बदलताना, जुन्या कंत्राटदाराचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक झाले. यासाठी तत्कालीन अनुज्ञापक मंडळ सदस्य श्री. अनिल गचके यांनी प्रयत्न केले. त्यासाठी तत्कालीन अध्यक्ष श्री. राजीव जतकर यांनी पाठपुरावा करून तसेच काही माहितीची रसद पुरवून मोलाचे कार्य केले. श्री जतकर यांच्या संकल्पनेतून फेब्रुवारी २०१० मध्ये इकॅम पुणे वार्ता या
त्रैमासिकाची सुरुवात करण्यात आली. या त्रैमासिकाचे पहिले संपादक होते श्री. राजेंद्र सिन्नरकर.
सन २०१२ मध्ये पुणे विभागाच्या दृष्टीने आणखीन एक महत्त्वाची गोष्ट घडली, ती म्हणजे इकॅम पॉलीकॅब ट्रेनिंग सेंटर. भारत भवन येथील कार्यालय अपुरे पडत असल्यामुळे हे नवीन कार्यालय आणि त्यासोबतच ट्रेनिंग सेंटर यांची खरेदी केली गेली. धनकवडी येथील के के मार्केटमधील प्रशस्त, सर्व अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असे हे ट्रेनिंग सेंटर, संघटनेच्या सभासदांच्या बरोबरच माफक शुल्क देऊन इतरांनाही वापरता येते. इकॅमचे माजी महासचिव तथा पुणे विभागाचे तत्कालीन अध्यक्ष श्री. मिलिंद नाईक यांच्या कालखंडात हा मोठा बदल घडला. बॉम्बे पोल फॅक्टरी, तेलवणे ट्रांसफार्मर आणि इतरही काही कंपन्यांना त्यांच्या कालखंडात सभासदांनी भेटी देऊन ज्ञान संबर्धन केले. याच कालखंडात निधी संकलन करण्यासाठी, गाण्यांच्या एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सकाळ माध्यम समूहाच्या वतीने साम टीव्हीवर कंत्राटदार आणि, महावितरण यांच्यात समन्वय साधण्यासाठी एका चर्चासत्रात श्री. नाईक यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.
श्री. सुनील गायकवाड यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात, विद्युत सुरक्षा या बाबीवर जास्त लक्ष केंद्रित केले होते. सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये विद्युत सुरक्षे बाबत पत्रके छापून अनेक गणेश मंडळांना वितरित केली होती. त्याचबरोबर नागरिकांचेही प्रबोधन केले होते. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यावेळी त्यांना सक्रिय पाठिंबा देऊन कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यास मदत केली. विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या वेळी चित्रपट गृहांमध्ये स्लाइड्स तसेच चित्रफिती मार्फत समाज प्रबोधन केले गेले. प्रदर्शनांमधून चांगले निधी संकलन करता येते, हे ध्यानात घेऊन त्यांनी सन २०१७ मध्ये ३६ स्टॉल्स असलेले विद्युत साहित्याच्या दोन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन केले. पुढच्या वर्षी लगेचच ५५ स्टॉल्स असलेल्या प्रदर्शनाचे यशस्वीपणे आयोजन केले. यासाठी त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी बहुमोल सहकार्य केले. तसेच प्रकल्पाचा नवीन विद्युत भार मंजूर करताना रोहीत्राची क्षमता ठरविताना मंजूर विद्युत भाराच्या क्षमतेला Diversity factor नुसार मंजूर करण्याचा नियम लागू केला गेला. या साठी तत्कालीन सचिव श्री. अमरनाथ पाटील व संचालक श्री समीर देवधर यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.
श्री. अमरनाथ पाटील, पुणे विभागाच्या अध्यक्ष पदी विराजमान झाल्यानंतर सन २०२२ मध्ये शंभर स्टॉल्सच्य, तीन दिवसीय एक्स्पोचे आयोजन केले होते. त्यासाठी सर्व संचालक मंडळाने झटून काम केले होते. त्याचा परिपाक म्हणजे संघटनेच्या गंगाजळीमध्ये भरीव वाढ झाली.
इकॅम पुणे विभागाच्या वतीने आजवर सभासदांच्या साठी
जीएसटी, विद्युत कायदा आणि नियम, व्यवसाय वृद्धी कशी करावी, यासारख्या अनेक विषयांवरही वेळोवेळी कार्यशाळा / चर्चासत्रे आयोजित केली होती. वीज हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातही वीज ही दैनंदिन जीवनाची अविभाज्य अंग आहे. आपल्यापर्यंत जी वीज पोहोचते तिचे सामान्यतः तीन टप्प्यात वर्गीकरण करता येईल. निर्मिती, पारेषण आणि वितरण. या सर्व टप्प्यांवर असंख्य घटक व उपघटक यांच्या सहयोगाने ही साखळी तयार होते. या साखळीतील एक अति महत्त्वाचा घटक म्हणजे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर होय. महाराष्ट्र राज्य बीज वितरण मंडळाचे विभाजन तीन कंपन्यांमध्ये झाले आहे. यासोबतच टाटा, अदानी, बेस्ट यांच्यासारख्या काही खाजगी कंपन्याही या क्षेत्रात कार्यरत आहेत. या सर्व कंपन्या आणि बीज ग्राहक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणजे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर. त्यांच्या माध्यमातूनच इकॅमने आजपर्यंत वेळोवेळी ग्राहकांचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विद्युत निरीक्षक, महावितरणचे विविध स्तरांवरील अधिकारी, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याशी समन्वय साधून सभासदांच्या अडचणी वेळोवेळी सोडविल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने विद्युत सुरक्षा सप्ताह साजरे होत असत. इकॅमच्या सभासदांनी त्यात वेळोवेळी तन, मन, धनाने सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
भविष्यातही सभासद हा केंद्रस्थानी ठेवून, इकॅम पुणे विभागाचे कार्य अव्याहतपणे सुरू राहील, अशी हमी सध्याचे अध्यक्ष श्री. अनिल महाजन यांनी दिली आहे.